अमेरिकन्स जागा

अमेरिकन्स जागा

 

 

आजकाल महासत्ता अमेरिकेला भेट देणे हे जवळपास प्रत्येकाच स्वप्न आहे. भेट देणाऱ्यांच्या संख्येत खूप वाढ पण झाली आहे. पुण्या मुंबई सारख्या शहरातील घरटी एक अमेरिकेत स्थाईक झालेला आहे. त्याच बरोबर शिक्षणानिमित,कामासाठी,लेकीसुनांच्या बाळंतपणासाठी,निव्वळ पर्यटनासाठी ह्या सातासमुद्रापलीकडच्या देशात भारतातून जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. महासत्ता हे बिरूद मिरवणारा,आधुनिकतेचा मापदंड असणारा हा देश जगभरातील सर्वांनाच आकर्षित करत असतो. LAND OF OPPORTUNITIES   म्हणून आजच्या युवापिढीला हा देश खुणावत आहे.

अश्या या महासत्ता देशाला भेट देण्याचा नुकताच योग आला.बऱ्याच वर्षापासूनच माझं पण ते एक स्वप्नच होत म्हणा ना!!!

३० तासांचा कंटाळवाणा प्रवास करून ह्या देशाच्या भूमीवर पाय ठेवेपर्यंत खरतर माझं खच्चीकरण झालं होतं. एवढा आटापीटा करून यायची गरज होती का ? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहिला नाही. लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या माता व मुलाबाळांच्या ओढीने हा प्रवास लीलया करणाऱ्या तमाम ज्येष्ठ नागरिकांना माझा मानाचा मुजरा !!!

सर्व सोपस्कार पार पडून एकदाचे ह्या देशात दाखल झालो. सर्व सुखसोयी,विविध पर्यटनस्थळाना भेटी, प्रत्येक ठिकाणच वेगळेपण,विविधतेने नटलेला हा देश पाहताना प्रवासात पडलेल्या प्रश्नाच उत्तर माझं मलाच सापडला. उत्तर होत ‘हो’, एवढा आटापीटा करून यायलाच हवं! हा देश पहिला. नैसर्गीक संपत्तीला तंत्रज्ञान व आधुनिकतेची जोड दिल्यास काय काय चमत्कार होऊ शकतात हे संपूर्ण अमेरिका फिरताना पदोपदी जाणवत होतं.

पण ह्या लेखनाचा माझा उद्देश प्रवास वर्णन नाही. गेली १५ ते १६ वर्षे आयुर्वेदाचार्य महणून वैद्यकीय व्यवसाय करताना प्रत्येक गोष्ट वैद्यकीय चष्म्यातून पाहण्याची वाईट सवय मला लागली आहे. आत्तापर्यंत पर्यटन,कॉन्फरन्स,व्यवसाय, शिकणे,शिकवणे अश्या अनेक कारणांनी जवळपास ७० % भारत व भारताबाहेर पण बऱ्याच देशांना भेट देण्याचा योग आला. प्रत्येक वेळी स्थळ दर्शनाबरोबरच तेथील स्थानिक लोक,त्यांची जीवनशैली,वैशिठ्यपूर्ण खाद्यपदार्थ,सामाजिकता व समाजाची मानसिकता याचं जवळून निरीक्षण करण हा माझा छंद आहे.

अमेरिका भेटीदरम्यान सुद्धा तेथे स्थाईक माझे काही नातेवाईक,काही पेशंट यांच्या घरी राहण्याचा व चर्चा करण्याचा योग आला.या सर्वांमधून समोर आलेली काही निरीक्षण हि धक्कादायक आहेत. या पैकी काही निरीक्षणे जी वैद्यकीय दृष्ट्या मला व्यक्तीशः धोकादायक वाटली ती अशी

सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे तिथली जीवनशैली. सध्याच्या आधुनिक युगात पाश्चिमात्य जीवनशैली ह्या गोंडस नावाखाली आपल्याकडे देखील हि जीवनशैली आपले हातपाय पसरवून स्थिरावू पाहते आहे. आयुर्वेदाप्रमाणे आहार व विहार हा कोणत्याही जीवनशैलीचा कणा आहे. YOU ARE WHAT YOU EAT   असं म्हटल जात. येथील लोकांच्या खाण्याच्या सवयी पाहिल्यावर ‘आहार कसा नसावा’ याच उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन लोकांचा आहार, असं म्हणावस वाटत.

सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे थंड पाणी,ज्यूस व कोक यांचे अतिरेकी सेवन.आयुर्वेदानुसार कोणतीही थंड गोष्ट हि शरीरात आम संचय ( ACCUMULATION OF TOXINS) करते.आधीच आमनिर्मिती करणाऱ्या आहाराला आमसंचयाची जोड.म्हणजे कोणत्याही व्याधी निर्मितीला अतिशय पोषक परिस्थिती.

आहाराचा विचार करता FAST FOOD चा अतिरेकी वापर. पदार्थ डीपफ्रीज मधून काढून MICROWAVE करण याला इथे स्वयपाक करणे असं म्हटलं जात. आयुर्वेदाप्रमाणे पुन्हा आम निर्मितीला आमंत्रणच. याच बरोबर ब्रेड,पिझ्झा,बर्गर यांचा रोजच्या आहारात असलेला अतिरेकी समावेश.हे सर्व पदार्थ मैदायुक्त. याच बरोबर चोकलेटस,कुकीज,बेकरी पदार्थ, मासाहार,आईसक्रिम,अल्कोहोल याची जोड.यामुळे आमाबरोबरच कफ वृद्धी पण होते.याचमुळे स्थौल्य (obesity) हि येथील सामाजिक समस्या आहे असं मला वाटत. याचबरोबर एक दिवस स्वयपाक करून तो आठवडाभर खाणे हि आणखी एक अजब गोष्ट. याला सुपर मार्केट मधून फ्रोझन पोळ्या आणून महिनोन्महिने खाण्याची जोड.

आयुर्वेदाप्रमाणे शिळे अन्न हे अनेक व्याधीच्या निर्मितीचे कारण आहे. एकीकडे नो शुगर,लो salt, zero calories चा डंखा पिटणाऱ्या ह्या अमेरिकन्सना सर्वरसयुक्त,ताज्या आहाराची संकल्पना पटवून देणे फार गरजेचे आहे.

याशिवाय smoothie नामक आरोग्यदायी संकल्पना इथे फारच प्रसिद्ध आहे.मी अमेरिकेत पाहिलेली smoothie  बनवण्याची पध्दत, हि आयुर्वेदातील विरुद्ध आहाराचे उत्तम उदाहरण आहे. असतील नसतील ती फळे, दही,सोयामिल्क, टोमाटो अश्या अनेक गोष्टी ब्लेंडरवर एकत्र फिरवून बनवलेली smoothie, आरोग्यदायी कशी ? हा प्रश्न मला पूर्ण प्रवासभर भेडसावत होता.

पुन्हा विरुद्ध आहार हे एक आम निर्मिती व पर्यायाने व्याधी प्रक्रियेतील महत्वाचे कारण आहे.

अमेरिकन समाजाकडे पहिले असता स्थौल्य,गुडघे दुखी,अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व,मलावष्टंभ,कोलेस्टेरोल युरीक acid चे वाढते प्रमाण ह्या समस्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. वर नमूद केलेला चुकीचा आहारच ह्याला कारणीभूत नाही ना?

आता थोड विहाराविषयी. सतत air conditioner मध्ये बसणे हे पुन्हा आम निर्मितीला कारणीभूत ठरते. सर्व मॉल्स, ऑफीसेस,घर,विमान,गाड्या अश्या सर्व ठिकाणी जरुरीपेक्षा जास्त AC चा वापर दिसतो.भर दुपारी १२ वाजता कोणीतरी कुठल्यातरी बागेत, रस्त्यावर पळताना,सायकल चालवताना दिसतात.चुकीच्या वेळी केलेला व्यायाम हा शरीरास घातक ठरू शकतो.आयुर्वेदाप्रमाणे जेवणानंतर व्यायाम केल्यास वातरक्त हा व्याधी होण्याची शक्यता असते,ज्यात युरीक acid वाढते. इथली बरीच जिम्स चोवीस तास चालू असतात. सोय म्हणून छान. जो तो आपल्या सवडीने येऊन वर्क आउट करू शकतो.एके दिवशी रात्री उशिरा फिरून घरी येताना ११ वाजता एका जिम मध्ये व्यायाम करणाऱ्यांची बऱ्यापैकी गर्दी पाहून मला धक्काच बसला.अवेळी व्यायामापेक्षा तो न केलेला बरा.

इथल्या सामाजिक,कौटुंबिक व्यवस्थेचे निरीक्षण केला असता अवास्तव वैयक्तिक स्वातंत्र्य प्रकर्षाने जाणवते.आपल्याकडे लोक काय म्हणतील ?हा पदोपदी भेडसावणारा प्रश्न ह्यांच्या डोक्यात पण येत नाही.सर्व जग व्यावहारिकतेच्या पातळीवर चालते.यामुळे तरल नाती,नात्यामध्ये येणारी आपुलकी,भावनिकता,बांधिलकी,प्रेम यांचा जणू दुष्काळच आहे.यामुळे येणारे मानसिक नैराष्य हा देखील एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे.हे नैराश्य घालवण्यासाठी मग दारू,सिगारेट,जुगार अशा व्यसनांच्या आहारी जाणारा समाज, हि एक धोक्याची घंटाच आहे.

आयुर्वेदातील स्वस्थ माणसाची व्याख्या हि केवळ शरीर स्वस्थ्यापूरती मर्यादित नसून त्यात मानसिक स्वास्थ्याचा पण समावेश केलेला आहे.म्हणूनच शारीरिक रोगातून मानसिक आजार व मानसिक ताणामुळे शारीरिक रोग होतात, असा शरीर व मनाचा अतिशय सुंदर संबंध आयुर्वेदात सांगितला आहे.

शारीरिक व मानसिक तोल गमावून बसलेल्या ह्या समाजाला आयुर्वेद हे एक वरदानच ठरेल,असं मला वाटत. आयुर्वेदात सांगितलेले आहार विहारा बद्दलचे नियम,दिनचर्या,ऋतुचर्या यांचे पालन करणे व साठलेला आम शरीरातून बाहेर काढण्यासाठी पंचकर्म चिकित्सा यांचा सुयोग्य वापर केल्यास हाच समाज प्रगतीची उतरोतर शिखरे गाठेल,असं विश्वास मला वाटतो.

मानसिक स्वास्थ्यासाठी योग,ध्यान धारणा यांसारख्या प्राचीन पद्धतीचे (ज्या आयुर्वेदाचाच एक भाग आहेत) पुरस्कर्ते इथे बरेच आहेत.त्यामुळे मानसिक स्वास्थ्य रक्षणाचे महत्व व त्याबद्दल झालेली जागृती व त्यासाठी प्राचीन पद्धतीचा अवलंब यांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि हि समाधानाची बाब आहे.

स्वतःचा कोणताही सांस्कृतिक वारसा नसलेल्या ह्या देशाने,जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लक्षावधी लोकांना आपल्यात सामावून घेतलं आहे. अगदी तसच त्यांनी आयुर्वेदाला सामावून घेतला तर ……………………..

READ THE SAME BLOG IN ENGLISH VERY SOON

डॉ. मंजिरी जोशी

आयुर्वेदाचार्य

९४०३३६०४५२