बदलते पालकत्व

नुकतीच वर्तमानपत्रात बातमी वाचली कि प्रथम वर्ष BAMS च्या विद्यार्थिनीची परीक्षेत नापास झाल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या……………. बातमी वाचून मन सुन्न झालं. मन ताळ्यावर यायला वेळ लागला व मग मात्र मन वेगाने विचार करायला लागलं.

सध्या सोशल मिडिया हा लहानांपासून मोठ्यान्पर्यंत सर्वांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.आपापली वय,आवडी,छंद याप्रमाणे जो तो त्याचा मुक्त हस्ते वापर करतो आहे. ह्याच सोशल मिडिया वर काही दिवसांपूर्वी एक video पाहण्यात आला.एक शिक्षक एका कागदावर मध्यभागी एक काळा ठिपका काढून, विद्यार्थ्यांना ह्या कागदाचे वर्णन करण्यास सांगतात. ते वर्णन सर्व विद्यार्थ्यांकडून ऐकून झाल्यावर शिक्षक म्हणतात, सर्वाना फक्त काळा ठिपकाच दिसला ? बाजूच्या शुभ्र पांढऱ्या कागदाचे वर्णन कोणीच केले नाही. आयुष्यात देखील एखाद अपयश, वाईट घटनेकडे आपण त्या काळ्या ठिपक्याप्रमाणे बघताना बाकीच्या सुंदर आयुष्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना ?

एखाद अपयश मग ते परीक्षेतल असू दे, प्रेमातल असू दे किवां अजून काही कारण असू शकेल, इतक महत्वाचं आहे कि त्यामुळे उर्वरित सुंदर आयुष्य निरर्थक वाटायला लागावा आणि मग ते संपवण्यासाठी आत्महत्येसारखं भ्याड पाउल उचलावं लागतं. यातून असा विचार मनात आला कि आजची युवा पिढी मानसिक सक्षमतेमध्ये कुठेतरी कमी पडते आहे का ? याचं उत्तर हो असेल तर साहजिकच पुढचा प्रश्न मनात येतो का ?

आणि ह्या का? च उत्तर शोधयचा प्रयत्न करताना पहिला विचार मनात आला तो ‘पालकत्वाचा’. पूर्वीपेक्षा आजचं पालकत्व खूप बदललं आहे. आजकाल एक, फारतर दुसर भावंड घरात असत. घरातील स्त्री शिक्षण, करीयरच्या निमित्ताने बाहेर असते. मुलांसाठी क्वालिटी टाईम हि कन्सेप्ट आली. ह्या सर्व स्पर्धात्मक युगात माझ्या मुलाला काही कमी पडलं नाही पाहिजे, त्याला जे हवं ते आम्ही देऊ अशी मानसिकता पालकांची दिसते. पण यातूनच मुलांना कोणताही नकार पचवायची सवयच लागतं नाही.यामुळे हीच मुलं पुढील आयुष्यात कोणताही नकार,अपयश यांना समोर जाण्याची मानसिकता नसल्यामुळे खचून जातात आणि नको त्या मार्गाचा अवलंब करतात.

मुलांना ‘नकार स्वीकारायला शिकवण’ (acceptance) हे आव्हान आजच्या पालकांपुढे आहे. याच बरोबर आपल्या मुलांची आवड,शारीरिक,बौद्धिक क्षमता यांचा पूर्ण विचार करूनच करीयर ची निवड करण्यास त्यांना फक्त मदत करावी. बऱ्याच वेळा बौद्धिक क्षमता नसताना, आवड नसताना केवळ पालकांची इच्छा महणून इंजिनियरिंग, वैद्यकीय शाखेकडे पाठवले जाते. आपल्या इच्छा, आकांक्षा त्यांच्यावर लादू नयेत. ह्याशिवाय कोणताही निर्णय घेताना नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे त्यातील चांगल्या व वाईट दोन्ही बाजू मुलांना समजावून सांगणे फार महत्वाचे आहे. यशाबरोबर अपयशाची कडू गोळी पचवायची ताकद आलीच पाहिजे. यशाच्या शिखराकडे वाटचाल करताना येणारी धोक्याची वळणे, काटेरी मार्ग याची जाणीव असण खूप गरजेचा आहे.लहान मुले हि मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात.त्यांना जसं घडवू, जसा आकार देऊ तसं ते घडतात.त्यामुळे हे सर्व प्रयत्न लहानपणापासूनच संस्कारक्षम वयात होणे महत्वाचे आहे.

आर्थिक सुबत्ता असली तरी सर्व गोष्टी पैशाने मिळत नाहीत याची जाणीव आई वडील व मुले सर्वानीच ठेवायला हवी.

आजच्या तरुण पिढीत खूप चांगले गुण आहेत. कोणताही बदल पटकन स्वीकारणे,निखळ मैत्री, एकमेकांना मदत करणे,सामाजिक बांधिलकी अश्या अनेक चांगल्या गुणांचे प्रतिनिधित्व आजची पिढी करत आहे.त्याच बरोबर मानसिक सक्षमता जरुरीची आहे.

म्हणूनच आजच्या युवा पिढीला सांगावसं वाटत,

जगणं खूप सुंदर आहे,

त्यावर हिरमुसू नका ,

एक फुल उमलल नाही,

म्हणून रोपच खुडू नका …..सगळं

मनासारखा होतं असं नाही ,पण

मनासारखं  झालेलं विसरू नका.

कोणत्याही घटनेवर,परिस्थितीवर over react होऊ नका.कोणत्याही नात्यात नात्यातील सखोलतेचा विचार करा.अपयशाने,नकाराने खचून न जाता त्याचा धीरोदात्तपणे सामना करा. सर्वात शेवटी…… आई वडील कधी रागवले, चिडले,ओरडले तरी तो राग मनात कधीच धरू नका.तुमच्या प्रगती,उत्कर्षामध्येच त्यांना आनंद असतो आणि ते चिडणं,रागावणं पण त्यासाठीच असतं…………………

शेवटी दोन पिढ्यांमध्ये समन्वय हाच सर्वांच्या हिताचा आहे.

निर्धाराच्या वाटेवर

टाक निर्भीडपणे पाय

तू फक्त विश्वास ठेव

आयुष्याची लढाई

फक्त हिमतीने लढ